रायगड(प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, असे आवाहन रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले आहे. विजयी मिरवणुका, जल्लोष किंवा कोणत्याही स्वरूपाच्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे सर्वांवर बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकांनंतर उत्साहाच्या भरात नियमभंग होण्याची शक्यता असते. मात्र अशा प्रकारांमुळे शांततेचा भंग होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर गर्दी, ध्वनीप्रदूषण, वाहतूक अडथळे किंवा अनुचित वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, कोणीही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणालाही विशेष सवलत दिली जाणार नाही. रायगड जिल्ह्यात शांतता, सलोखा आणि सुरक्षितता अबाधित ठेवणे हे पोलिस प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
निवडणुकीचा आनंद साजरा करताना जबाबदारीचे भान ठेवून सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









