पेण (प्रतिनिधी): पेण तालुक्यातील तरणखोप ब्रिज परिसरात JSW कंपनीचे पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या दोन ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील ट्रेलर काही कारणास्तव रस्त्यावर थांबलेला होता. त्याच वेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेलरने वेगावर नियंत्रण न राहिल्याने थांबलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातात मागील ट्रेलरच्या चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी चालकाला तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली. तसेच अपघातग्रस्त वाहनांना रस्त्याच्या कडेला हलविण्याची कार्यवाही करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास संबंधित पोलिस ठाण्याकडून सुरू आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









