‘भाजपमध्ये गेलो तर जिंकू’ असा समाज असलेल्यांचा फुगा फुटला !


पक्षांतर केलेल्या दिग्गज नेत्यांचा ‘रायगड’च्या मतदारांनी उडवला धुव्वा

पनवेल तालुक्यात शेकापचा पारंपरिक बालेकिल्ला ढासळल्याचे स्पष्ट

पनवेल (प्रतिनिधी): कधी काळी रायगड जिल्ह्यावर पकड असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला उतरती कळा लागल्याचे चित्र राज्यात आहे. 2017 पर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही स्तरांवर एकहाती सत्ता, अनेक दिग्गज नेत्यांसह माजी आमदार विवेक पाटील आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांसारखे यांसारखे प्रभावी नेते होते. ज्यांच्या बळावर शेकापने अनेक वर्षे तालुक्यात राजकीय पकड कायम ठेवली होती. पण मात्र आता 2026 मध्ये महायुतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालात शेकापच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे.

यंदाच्या निवडणुकीत शेकापला साधा भोपळाही फोडता आलेला नाही. तसेच ज्या काही मातब्बर नेत्यांना शेकापची साथ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले त्यांनाही मतदारांनी नाकारले आहे. यामुळे शेकापचे अस्तित्वच धोक्यात आल्यासह मतदारांना गृहीत धरणे भाजपला अंगलट आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्यातील पारंपरिक राजकीय समीकरणांना मोठा धक्का दिला आहे. अनेक वर्षे जिल्हा परिषदेवर वर्चस्व राखणाऱ्या शेकापला यंदा एकही जागा जिंकता आली नाही. या निकालामुळे शेकापच्या प्रभावाला मोठी उतरती कळा लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही मातब्बर उमेदवारांनाही मतदारांनी नाकारल्याने पक्षांतराचा फायदा झाला नाही, हे अधोरेखित झाले. शेतकरी कामगार पक्षाचा सातत्याने होत असलेल्या पराभवाचे सातत्य या निवडणुकीतही कायम राहिले. शेकापला पक्षफुटीचा मोठा फटका बसला. शेकाप सोडून भाजपत गेलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ॲड. नीलिमा पाटील, माजी बांधकाम सभापती चित्रा पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या पत्नी भावना पाटील, पुत्र सवाई पाटील यांचा मोठा पराभव झाला आहे.