शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने; गोगावले विरुद्ध तटकरे संघर्ष टोकाला
सत्ता स्थापनेसाठी युतींचे गणित निर्णायक; भाजप ‘किंगमेकर’च्या भूमिकेत
रायगड(प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकून मोठी मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांपैकी शिवसेनेचे २१ उमेदवार विजयी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, भाजपचे १५, ठाकरे गटाचे ५ आणि काँग्रेसचे २ उमेदवार निवडून आले. सर्वात मोठा पक्ष ठरूनही शिवसेनेला बहुमत मिळाले नाही, त्यामुळे सत्तास्थापनेचे गणित गुंतागुंतीचे झाले आहे.
सत्तास्थापनेवरून मंत्री भरतशेठ गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात चढाओढ सुरू झाली आहे. गोगावले यांनी भाजप शिवसेनेसोबत येईल असा दावा करत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र तटकरे यांनी भाजपसोबत निवडणूकपूर्व युती असल्याचे सांगत राष्ट्रवादीच जिल्हा परिषद ताब्यात घेईल असा विश्वास व्यक्त केला आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे महायुतीतील मतभेद उघडपणे समोर आले आहेत.
पंचायत समित्यांमध्येही शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात सत्ता विभागली गेली आहे. काही ठिकाणी शिवसेना, काही ठिकाणी राष्ट्रवादी तर अनेक ठिकाणी भाजपला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवरील सत्तास्थापना भाजपच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे. रायगडातील हा राजकीय डावपेच राज्याच्या राजकारणातही नवा ट्विस्ट निर्माण करू शकतो, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.









