97 पदांसाठी 5,373 अर्ज; रायगड पोलीस भरतीकडे राज्याचे लक्ष


अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्हा पोलीस दलाच्या शिपाई व चालक भरतीसाठी यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अवघ्या 97 पदांसाठी तब्बल 5,373 अर्ज दाखल झाले आहेत. 11 ते 16 फेब्रुवारीदरम्यान अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. पोलीस वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भरतीअंतर्गत पोलीस शिपाईची 94 पदे व चालक पोलीस शिपाईची 3 पदे भरण्यात येणार आहेत. शिपाई पदासाठी 3,563 तर चालक पदासाठी 1,810 अर्ज प्राप्त झाले आहेत. मोठ्या संख्येने उमेदवार सहभागी होत असल्याने संपूर्ण प्रक्रिया अत्यंत काटेकोर नियोजनासह राबविण्यात येत आहे.
भरती पूर्णपणे पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित पद्धतीने होणार असून बायोमेट्रिक व फोटो पडताळणी, चिप-आधारित नोंदणी, मैदानावर सीसीटीव्ही देखरेख, तसेच धावण्याच्या स्पर्धांसाठी इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक स्पर्धा प्रकारासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रक्रियेसाठी 42 पोलीस अधिकारी, 329 अंमलदार आणि 36 मंत्रालयीन कर्मचारी तैनात असून 10 फेब्रुवारी रोजी रंगीत तालीम पार पडली. कोणत्याही गैरप्रकाराला थारा दिला जाणार नसल्याचा इशारा देत, कोणी पैशांची मागणी केल्यास 02141-228473 / 222028 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या उमेदवारांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.