रायगड(प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १५ सदस्य निवडून आल्यानंतर, पक्षाच्या गटनेते पदाची माळ माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांच्या गळ्यात पडली आहे. अलिबाग येथील भाजप कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व संमतीने हा निर्णय घेण्यात आला.
निवडून आलेल्या सर्व १५ सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपली अधिकृत नोंदणी पूर्ण केली. त्यानंतर भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वैकुंठ पाटील यांच्या निवडीची घोषणा केली.
वैकुंठ पाटील यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी काम केले आहे. त्यांचा हा अनुभव लक्षात घेऊनच त्यांची गटनेते पदी निवड करण्यात आली.
आमचे सर्व सदस्य वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असतील, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मंत्रिमंडळ रायगडच्या विकासकामांसाठी निश्चितपणे सहकार्य करेल, अशी खात्रीही त्यांनी यावेळी दिली.
ज्या विश्वासाने मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून दिले आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सर्व सदस्य जोमाने काम करतील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
या निवडीनंतर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, वैकुंठ पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









