सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अलिबाग २६ वा वर्धापनदिन व रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न


अलिबाग (प्रतिनिधी) : सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चा २६ वा वर्धापनदिन आणि यशस्वी २५ वर्षांची गौरवशाली वाटचाल उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य भजन महोत्सवाला सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि भजन रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या भजन महोत्सवात नामवंत कलाकारांनी आपली सुरेल मैफल सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संगीत चक्री भजन जुगलबंदीत गायक श्री. कृष्णा देशमुख व श्री. वैभव थोरवे यांनी रंगतदार सादरीकरण केले. पखवाज साथ श्री. गणेश लोभी व तबला साथ श्री. समीर हडप यांनी कार्यक्रमाला भव्यता प्रदान केली.
तसेच श्री गणेश महिला प्रासादिक भजन मंडळ, वेलवली (अलिबाग) यांच्या गायिका जागृती कृष्णा पाटील यांनी पखवाज साथ श्री. सागर जंगम व तबला साथ विजय शिंदे यांच्या सहकार्याने भक्तिरसाची उधळण केली.
गोकुळेश्वर प्रासादिक भजन मंडळ, वेश्वी (अलिबाग) येथील गायक श्री. निलेश जंगम तसेच हनुमान प्रासादिक भजन मंडळ, बेलकडे (अलिबाग) येथील गायक श्री. अनंत म्हात्रे यांनी पखवाज साथ श्री. गणेश पाटील यांच्या सहयोगाने कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढविली.
या भजन महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात माजी जिल्हा सरकारी वकील श्री. प्रसाद शांताराम पाटील यांचा मोलाचा सहभाग लाभला.
रौप्यमहोत्सवी वर्षात संस्थेने ५० कोटी रुपयांच्या ठेवींचा ऐतिहासिक टप्पा गाठत सहकार क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केले आहे. सभासदांना २५% लाभांश वाटप तसेच ठेवींवर १०% परतावा देऊन संस्थेने सहकार चळवळीत एक आदर्श पायंडा पाडला आहे. आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि सभासदकेंद्री धोरण यामुळे संस्थेचा नावलौकिक अधिक वृद्धिंगत होत आहे.
वर्धापनदिनानिमित्त विविध मान्यवरांनी संस्थेस भेट देऊन शुभेच्छा व अभीष्टचिंतन व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
संस्थेची प्रगतीची घोडदौड अशीच अविरत सुरू राहील, यासाठी संचालक मंडळ, कर्मचारीवृंद, सभासद आणि हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. योगेश मगर यांनी नमूद केले. भविष्यातही सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरत अधिक सक्षम व लोकाभिमुख सेवा देण्याचा संकल्प संस्थेने यानिमित्ताने व्यक्त केला आहे.