नवी मुंबईत भंगार विक्रीच्या नावाखाली अंमली पदार्थांचा खुलेआम व्यापार !


नेरुळमधील रेल्वे रूळ परिसरात राजू राठोड व नातेवाईकांचा गोरखधंदा

पोलिसांनी तब्बल ७ आरोपींच्या मुसक्या आवळल्या; २२ लाखांचे हेरॉईन जप्त

नवी मुंबई (प्रतिनिधी): नवी मुंबईमध्ये भंगार व्यवसायाच्या नावाखाली अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीवर नेरूळ पोलिसांनी मोठी कारवाई करत ७ जणांना अटक केली आहे. नेरूळ सेक्टर 28 रेल्वे पटरी परिसरात राजू बाबू राठोड आणि त्याचे नातेवाईक भंगार दुकानाच्या आडून ड्रग्ज विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ४ पोलीस अधिकारी व १५ अंमलदारांच्या पथकाने छापा टाकला.

या कारवाईत सुमारे 22 लाख रुपये किमतीचे 43.6 ग्रॅम वजनाचे हेरॉईन तसेच 26 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राकेश सचिन वाघरी, राजेंद्र भीमा काळे, अनिता संजय पवार, राजू बाबू राठोड, शिवराज लक्ष्मण पवार, कमळाबाई बाबू राठोड आणि सुमन राजू राठोड अशी आहेत. सर्व आरोपी नेरूळ रेल्वे स्टेशन पब्लिक ब्रिजजवळील झोपडपट्टी परिसरातील रहिवासी आहेत.

राजू राठोड याच्यावर यापूर्वीही नेरूळ पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून विशाल आणि गंगा काळे हे आरोपी फरार आहेत. तसेच राजू राठोडचे भंगार दुकान अनधिकृत जागेत असल्याने ते निष्कासित करण्यात आल्याचे समजते.