अजितदादा गेल्याने खेळ क्षेत्राचे मोठे नुकसान – माजी खासदार रामशेठ ठाकूर


पनवेल (प्रतिनिधी): “स्वर्गीय अजितदादा यांच्या निधनामुळे क्रीडा क्षेत्राचे, विशेषतः कबड्डी खेळाचे मोठे नुकसान झाले आहे,” असे प्रतिपादन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल येथे त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रायगड जिल्हा कबड्डी पंच शिबिरात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे  सहकार्यवाह ॲड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या प्रमुख कार्यवाह डॉ. चित्राताई पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद भोईर, प्रमुख मार्गदर्शक जे. जे. पाटील, जगदीश पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शरद कदम, सुमित माने, नरेश म्हात्रे, जनार्दन पाटील, पनवेलचे क्रीडा प्रमुख व्ही. बी. नाईक, पंच मंडळाचे सचिव ॲड. अजिंक्य पाटील, कार्यालयीन प्रमुख अनिल कोळी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना रामशेठ ठाकूर म्हणाले की, स्व. अजितदादा हे क्रीडा क्षेत्रातील आधारस्तंभ होते. कबड्डी खेळाडूंना ५ टक्के नोकरी आरक्षण देण्याचा निर्णय त्यांच्या प्रयत्नांतून झाला. पनवेलमध्ये आयोजित विविध स्पर्धांना त्यांची नेहमीच प्रमुख उपस्थिती असायची. त्यांनी महाराष्ट्र ऑलिंपिक कबड्डी संघटनेचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांच्या जाण्याने क्रीडा क्षेत्राची मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
दि. २० ते २२ दरम्यान होणाऱ्या रायगड जिल्हा चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह ॲड. आस्वाद पाटील यांनी पंचांच्या अडचणी व तक्रारी जाणून घेत त्यांचे समाधान केले. “आम्ही पंचांच्या सोबत आहोत,” असे सांगत त्यांनी पंचांना उद्बोधित केले.
सदर पंच शिबिर सकाळी व दुपारच्या सत्रात पार पडले. राष्ट्रीय पंच सुहास पाटील आणि प्रसन्ना यांनी पंचांना सविस्तर मार्गदर्शन केले.