जिल्ह्यातही महायुती धर्म पाळणार गटनेते निवडीनंतर आमदार महेंद्र दळवींचे सूचक विधान
रायगड(प्रतिनिधी): रायगड जिल्ह्याच्या राजकारणात आज एक महत्त्वाची घडामोडी घडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, अलिबाग येथील हॉटेल रविकिरण येथे शिवसेना जिल्हा परिषद गटाची आढावा बैठक आणि गटनेते निवडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या बैठकीत शिवसेना गटनेतेपदी मानसी महेंद्र दळवी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी गटनेते पदासाठी मानसी दळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला उपस्थित सदस्यांनी अनुमोदन दिल्यानंतर त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर ही निवड अत्यंत कळीची मानली जात आहे.
निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी महायुती म्हणून एकत्र काम करणे काळाची गरज आहे.कालच आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सरकारमध्ये आम्ही सर्व एकत्र आहोत, त्यामुळे जिल्ह्याच्या पातळीवरही महायुती म्हणूनच आम्हाला पुढे जावे लागेल.
राजकारणात काहीही होऊ शकते, मात्र आमचा कल स्पष्टपणे भारतीय जनता पक्षासोबत (महायुती) जाण्याचा आहे. सर्वांनी एकत्र आल्याशिवाय जिल्ह्याचा विकास शक्य नाही.येणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जी काही प्रक्रिया असेल, ती आम्ही महायुतीचा धर्म पाळून पूर्ण करू आणि नक्कीच यशस्वी होऊ.
बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानसी दळवी यांच्या निवडीमुळे अलिबागसह रायगड जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेची पकड अधिक घट्ट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.









