पुणे(प्रतिनिधी): शरद पवार यांना आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथून डिस्चार्ज देण्यात आला. छातीत कफ साचणे व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना सोमवार, दि. ९ रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर आवश्यक औषधोपचार आणि निरीक्षणाखाली उपचार सुरू होते.
रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. सर्व आवश्यक तपासण्या समाधानकारक आल्याने आज त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र पूर्ण बरे होण्यासाठी पुढील काही दिवस विश्रांती घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. डिस्चार्जची बातमी समजताच पक्ष कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. डॉक्टरांनी गर्दी टाळण्याचे आणि संसर्गापासून दूर राहण्याचेही आवाहन केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच ते नियमित कामकाजात सहभागी होतील, अशी माहिती जवळच्या सूत्रांनी दिली.









