रायगड(प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट क्र. ३७- कोर्लई (ता. मुरुड) येथील निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उमेदवार ॲड. मनस्वी महेश मोहिते यांनी मतमोजणीत अनियमितता झाल्याचा आरोप करत फेरमतमोजणीची मागणी केली आहे.
९ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या मतमोजणीत एकूण ३९ ईव्हीएम मशीनची पाच फेऱ्यांत मोजणी करण्यात आली. मात्र, ही प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पडली नसल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.
प्रमुख आरोप पुढीलप्रमाणे :
फॉर्म व्हीएम-४ मध्ये ईव्हीएममधील मतांची नोंद करताना आवश्यक स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या नाहीत.
काही मतदान केंद्रांवरील प्रत्यक्ष मतसंख्या आणि अधिकृत नोंदीत तफावत आढळली.
विशेषतः मतदान केंद्र क्र. ३७-१ मधील आकडेवारीबाबत गंभीर शंका उपस्थित.
मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव.
ॲड. मोहिते यांनी आरोप केला आहे की, शिवसेना पक्षाच्या उमेदवार ज्योती रमेश नागावकर यांना विजयी करण्याच्या उद्देशाने निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक अधिकारी व पर्यवेक्षक यांनी पक्षपातीपणे काम केले. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर संशय निर्माण झाला आहे.
अर्जामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर प्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम १३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून पारदर्शक पद्धतीने फेरमतमोजणी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी ॲड. मनस्वी मोहिते यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“मेरिटवर आम्हालाच न्याय मिळेल,” असा विश्वास ॲड. महेश मोहिते व ॲड. मनस्वी मोहिते यांनी व्यक्त केला असून, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Home ताज्या बातम्या कोर्लई जिल्हा परिषद मतमोजणीवर अनियमिततेचा आरोप; उच्च न्यायालयात रिट याचिका, फेरमतमोजणीची मागणी









