कोर्लई गट मतमोजणीवर आक्षेप; फेरमतमोजणी नाकारल्याचा आरोप


अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील कोर्लई गटातील मतमोजणी प्रक्रियेवर उमेदवार ॲड. मनस्वी मोहिते यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. प्रत्येक ईव्हीएममधील एकूण मतांची नोंद करून त्यांची उमेदवारनिहाय विभागणी केली जाते; मात्र कोर्लई गटातील ३९ ईव्हीएम मशिन्सच्या नोंदींवर मतमोजणी प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घेऊन खात्री करण्यात आली नाही, असा त्यांचा आरोप आहे.
मतमोजणीदरम्यान अफरातफरीची शंका निर्माण झाल्याने फेरमतमोजणीसाठी अर्ज केला होता; परंतु कोणतेही सबळ कारण न देता तो तत्काळ फेटाळण्यात आल्याचा दावा मोहिते यांनी केला. एका मतदान केंद्रातील ईव्हीएमवरील आकडेवारी आणि प्रत्यक्ष मतदानाच्या एकूण संख्येत तफावत आढळल्याचे त्यांनी नमूद केले. ही तफावत आकडेजोड करून पर्यवेक्षकांनी मेळ बसवण्याचा प्रयत्न केला; मात्र या प्रक्रियेवरही प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या नसल्याचे ते म्हणाले.
तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांची एकत्रित आकडेवारी भरताना विहित नमुन्यात छेडछाड करून नव्याने तयार केलेल्या फॉर्मचा वापर केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित सहाय्यकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मोहिते यांनी राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात केली आहे.