अलिबाग – रोहा मार्गावर वाहतूक कोंडी; रस्त्याच्या नूतनीकरणाचा बसतोय फटका


रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग – रोहा रस्त्याच्या नूतनीकरण आणि रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सहाणगोठी ते सहाण बायपास आणि आरसीएफ कॉलनी कुरुळ गेट ते कुरुळ वळण या दरम्यान हे काम सुरू आहे. कंत्राटदाराने सुरू केलेले काम निश्चित गुणवत्ता पूर्ण होत असलेतरी या कामाचा फटका इयत्ता बारावीचे विद्यार्थी आणि शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना बसला आहे. या कामामुळे या परिसरात रोज वाहतूक कोंडी होत असल्याने सर्वच वाहनांना अलिबाग पर्यंत पोहचणे जिकरीचे बनले होते. एक ते दिड तास बेलकडे ते अलिबागला पोहचायला लागतो आहे. आज सकाळी अकरा वाजता इयत्ता बारावीचा पेपर होता यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहचता आले नाही. खरेतर हे काम करणाऱ्या कंत्राटदाराने वाहतूक नियोजन करण्यसाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे संपर्क करणे अपेक्षित होते परंतु तसे न केल्याने या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे.
ठीक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत ते काम संथ गतीने सुरू आहे आणि रस्त्यावर नुसती खडी, डबर, माती आणि ग्रीट यामुळे रस्त्यावर धुळीचे लोट तयार झाले आहेत, यामुळे नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागत आहे.
आज झालेल्या ट्रॅफिकमुळे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी पायपीट करत परीक्षा केंद्र गाठण्याचा प्रयत्न केला. काही विद्यार्थ्याना उशिराने केंद्रावर पोहचता आले. यामुळे इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा असेपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगड पोलिसांनी या रस्त्यावर चालकांच्या बेशिस्तीला लगाम घालावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला परीक्षेचे गांभीर्य आहे की नाही असा सवाल संतप्त पालकवर्ग करीत आहेत.