सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2025 जिल्हास्तरीय द्वितीय व तृतीय विजेत्या मंडळांचा गौरव व पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न


रायगड-अलिबाग(जिमाका):- सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2025 स्पर्धेत जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक श्री युवा मित्र मंडळ, पनवेल, नवी मुंबई (पारितोषिक रक्कमः रु. 40000/-), तृतीय क्रमांकः सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, रोहा, रायगड (पारितोषिक रक्कमः रु.30000/-) यांचा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते गौरव व पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धा पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने राबविण्यात आल्या होत्या.

ही स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर राबविण्यात आली होती. मंडळांची निवड करताना  कला व संस्कृतीः पारंपरिक कलांचे (गायन, वादन, नृत्य इ.) आयोजन आणि दुर्मीळ वस्तूंचे प्रदर्शन, सामाजिक कार्यः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी राबविलेले उपक्रम पर्यावरण पूरक गणेशोत्सवः प्रदूषण विरहित परिसर, पर्यावरणपूरक मूर्ती आणि सजावट निसर्ग जतनः गडकिल्ले संवर्धन आणि स्वच्छतेबाबत केलेली जनजागृती या प्रमुख निकषांचा विचार करण्यात आला होता.

जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक संत रोहिदास तरुण विकास मंडळ, महाड (पारितोषिक रक्कमः रु. 50,000/-). हे राज्य स्तरावरील मुख्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आले आहे.