अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेल स्वामी छाया येथे सोमवारी (दि. १६) सायंकाळच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीत हॉटेलमधील फर्निचर व अन्य साहित्याचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आग लागल्याची माहिती मिळताच अलिबाग नगरपरिषदेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्परतेने आग आटोक्यात आणत हॉटेलमधील गॅस सिलिंडर आणि ज्वलनशील साहित्य बाहेर काढले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. रात्री उशिरापर्यंत आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेण्याचे काम सुरू होते तसेच खबरदारी म्हणून परिसरात पाण्याचा मारा करण्यात आला.
घटनेनंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अलिबाग पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक किशोर साळे व त्यांच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. मावळा प्रतिष्ठान चे आकाश राणे व अलिबाग नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा अँड. मानसी म्हात्रे यांनी भेट देत हॉटेल मालकांची विचारपूस केली आणि पंचनामा करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या. पुढील तपास सुरू आहे.









