अलिबाग (प्रतिनिधी): आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्तीसाठी रायगड जिल्ह्यातील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली. आजच्या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो ग्राम पंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. आपल्या मागण्या वेळेत मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आक्रमक आंदोलकांकडून देण्यात आला.
रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांना निवेदन सादर केले आहे. शासन मान्यता व इतर प्रशासकीय निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.
निवेदनात किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी व इतर सेवा सुविधांबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. सेवा निवृत्तीनंतर लाभ देण्याबाबत होत असलेल्या दिरंगाईवरही संघटनेने आक्षेप घेतला आहे. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे रजा व इतर नियम लागू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
सन 2024 मधील वेतनाची थकबाकी, तसेच काही तालुक्यांतील कर्मचाऱ्यांना प्रलंबित रक्कम अदा न झाल्याचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. याशिवाय उपदान अधिनियम 1972 ची अंमलबजावणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही लागू करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे.









