अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील पूर्व विभागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे वाहतूक कोंडीची भीषण समस्या निर्माण झाली असून, याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना आणि सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. याबाबत ‘चिंतामणराव केळकर विद्यालय, चेंढरे’ यांच्या वतीने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अलिबाग शहराच्या हद्दीबाहेरील कुरुळ ते सुडकोली आणि कुरुळ-आक्षी मार्गे रेवदंडा बायपास रोडवर सध्या रस्ते, क्रॉसड्रेन आणि गटारांची कामे सुरू आहेत. मात्र, ही कामे कोणत्या ठेकेदाराची आहेत किंवा कोणत्या विभागामार्फत सुरू आहेत, याची माहिती देणारा कोणताही फलक या ठिकाणी लावण्यात आलेला नाही. परिणामी, नियोजनाअभावी या परिसरात दररोज मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
सध्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. वाहतूक कोंडीमुळे चिंतामणराव केळकर विद्यालयाचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले असून विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचू शकत नाहीत किंवा घरी परतताना त्यांना उशीर होत आहे. या गंभीर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
रस्त्यांवरील वाहतूक नियोजनासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात तातडीने लक्ष न दिल्यास, शाळेतील २००० विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना घेऊन शाळेसमोरच रस्त्यावर ‘बैठक मारून’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यालयाचे अध्यक्ष दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीने देण्यात आला आहे.आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









