मुंबई (धनश्री रेवडेकर) :अजितदादांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात आज सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या वेळी अजितदादांच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी सीबीआयमार्फत करण्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. घटनेबाबत विविध शंका उपस्थित होत असल्याने पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत, याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे राज्य सरकारतर्फे पत्रव्यवहार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणी पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.









