अलिबाग(प्रतिनिधी): शिवप्रेमी अलिबाग एसटी स्टँड मित्रपरिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला अलिबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी किशोर साळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली.
यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी केलेल्या शिवाजी महाराजांचा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. अंगावर रोमांच आणणारे पोवाडे, भगवे झेंडे, भगवे फेटे आणि शिवप्रभूंचा जयजयकार यामुळे वातावरण शिवमय झाले होते. कार्यक्रमात विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक नागरिक तसेच तरुणांचा मोठा सहभाग होता. शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि स्वराज्य स्थापनेतील त्यांच्या पराक्रमाचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या आयोजनात मित्रपरिवाराच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच अलिबागमधील पत्रकार बांधवही कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी उत्साहात भर घातली. कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
शिवजयंती निमित्ताने समाजात ऐक्य, शौर्य आणि देशभक्तीची भावना दृढ व्हावी, हा संदेश यावेळी देण्यात आला.









