रायगड (प्रतिनिधी): मुंबईला थेट कोकणाशी जोडणाऱ्या रेवस–रेड्डी सागरी महामार्ग प्रकल्पाला वेग आला असून उरण–अलिबाग दरम्यान उभारल्या जाणाऱ्या करंजा–रेवस सागरी पुलाचे काम जलदगतीने सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) मार्फत राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सुमारे १० टक्के काम पूर्ण झाले आहे. वर्षअखेरीस ५० टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
करंजा मच्छीमार बंदरालगत समुद्रात मोठे दगड टाकून मार्गाची पायाभरणी सुरू आहे. या सागरी पुलासाठी अंदाजे २,४७८ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. पुलाची एकूण लांबी १०.२०९ किलोमीटर असून तो मुंबईतील सागरी सेतू मार्गे द्रोणागिरी नोडशी जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबई–कोकण प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे.
या प्रकल्पाची पहिली घोषणा १९८० साली करण्यात आली होती. मात्र सत्ता बदल, प्रशासकीय अडथळे आणि आर्थिक कारणांमुळे प्रकल्प रखडला होता. तब्बल ४३ वर्षांनंतर आता प्रत्यक्षात पुलाचे बांधकाम सुरू झाल्याने कोकणवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, पुलाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी करंजा येथील चाणजे महसूल हद्दीतील जमीन संपादनास स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. नियोजित मार्ग बदलून द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याशी रस्ता नेण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे पर्यावरणीय धोका निर्माण होऊ शकतो, अशी त्यांची भूमिका आहे. तसेच शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य मोबदला देण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
करंजा–रेवस सागरी पुलामुळे रायगडसह मुंबई–गोवा व संपूर्ण कोकणातील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत ५० टक्के काम पूर्ण करून २०२८ पर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे लक्ष्य असल्याचे एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध बोराडे यांनी सांगितले.









