अलिबाग(प्रतिनिधी): हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये सोमवारी (ता.23) श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनपटावर आधारित भक्तीगीत एकाच वेळी सामुहिकरित्या गाण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 548 शाळांमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने सोमवारी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनपटावर आधारित भक्तीगीत एकाच वेळी सामुहिकरित्या गाण्यात आले. या विशेष उपक्रमाची दखल ‘बेस्ट आॅफ इंडिया रेकाॅर्ड्स’ या संस्थेकडून घेतली असून जागतिक विक्रमाच्या यादीमध्ये याची नोंद करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 548 शाळांमध्ये हा कार्यक्रम उत्साहात राबविण्यात आला. सामुहिक भक्तीगीत गायनानंतर विद्याथ्र्यांना श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा जीवनपट, त्यांनी केलेले कार्य याची माहिती देण्यात आली.
अलिबाग शहरातील जनरल अरूणकुमार वैद्य हायस्कूल येथे रायगड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यक्रारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अलिबाग तालुका गटशिक्षण अधिकारी कृष्णा पिंगळा, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव साळवे, स्टाफ सेके्रटरी निवान केदार, शिक्षक प्रतिनिधी दीपक पाटील यांच्यासह इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्याथ्र्यांनी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनपटावर आधारित भक्तीगीत सुरेल स्वरात सादर केले. खोपोली येथील जनता विद्यालयातील विद्याथ्र्यांनीही एकाच वेळी सुप्रसिद्ध गायक सरताज सिंग यांनी गायलेले हिंद-दी-चादर हे गीत सादर केले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाळे, उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, गटशिक्षणाधिकारी दीपा परब, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव किशोर पाटील, विद्यालयाचे प्राचार्य कानिफनाथ गोरे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात एकूण 3 हजार 548 शाळांमधील 4 लाख 94 हजार 435 विद्यार्थी आणि 19 हजार 716 शिक्षक सहभागी झाले होते.
**********
कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत जिल्हाधिकारी किशन जावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री गुरु तेग बहादूर यांच्या स्वप्नातील ‘अखंड भारताच्या’ नकाशाची साकारलेली हुबेहूब मानवी प्रतिकृती होती. यावेळी सहभागी विद्यार्थिनींनी तिरंगी रंगांच्या टोप्या व फुगे घेऊन अखंड भारताच्या नकाशाच्या सीमारेषेवर उभे राहून प्रत्यक्ष तिरंग्याचेच स्वरूप साकारले होते. या प्रदर्शनात एका विद्यार्थिनीने श्री गुरु तेग बहादूर यांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सामूहिक गीतानंतर मान्यवरांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगे सोडून या दिनाचा उत्साह द्विगुणित करण्यात आला. याच सोहळ्यादरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.









