मुंबई (धनश्री रेवडेकर) : मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आपल्या मतदारसंघातील धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आमदार आझमी यांनी एका खाजगी सिमेंट कंपनीवर थेट निशाणा साधला. मी राहत असलेल्या मानखुर्द शिवाजीनगर भागात धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. माझ्या घराच्या बाजूलाच ‘आर. एस.’ नावाची सिमेंट कंपनी आहे, ज्याच्या कामकाजामुळे परिसरात धुळीचे लोट पसरत आहेत,असे आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी नामांकित संस्थांनी यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. टाटा इन्स्टिट्यूट (TISS) सारख्या संस्थांनी या भागातील प्रदूषणाचा अभ्यास करावा आणि सत्य परिस्थिती समोर आणावी, असे आवाहनही त्यांनी केले. वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार वाढत असून, स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर लवकरच उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.









