नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईच्या पोलिसांनी तळोजा परिसरात थरारक कारवाई करत नवी मुंबईतील अंमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे उध्वस्त केले आहे. घोटकॅम्प परिसरातील महावीर मॅजेस्टी इमारतीतील एका घरात गुप्तपणे चालणाऱ्या ड्रग्स व्यवहारावर पोलिसांनी अचानक छापा टाकत २ तरुणांना अटक केली असून सुमारे १ कोटी २ लाख ८ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सापळा रचला. या छाप्यात हेरॉईन आणि अफू पावडर प्लास्टिक पिशव्यांमध्ये लपवून ठेवलेली आढळली. तज्ज्ञ तपासणीत ११८ ग्रॅम हेरॉईन आणि १४३.६ ग्रॅम अफू पावडर असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी २४ वर्षीय सुरींदर गुरजंत सिंग उर्फ काळू आणि २७ वर्षीय मनिंदर गुरजंत सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघे पूर्वी कळंबोली वसाहतीत राहत असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, हा अमली पदार्थ पंजाबहून आणणारा ट्रक चालक फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. नवी मुंबई पोलिसांनी गेल्या २ वर्षांत ड्रग्सप्रकरणी २०० हून अधिक गुन्हे दाखल करून सुमारे ९६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरोधात दररोज कारवाई केली जात असून त्यामुळे शहरात ड्रग्स सेवनावर काही प्रमाणात नियंत्रण आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ही कारवाई केवळ एका छाप्यापुरती मर्यादित नसून, नवी मुंबईत पसरलेल्या आंतरराज्य ड्रग्स नेटवर्कच्या खोलवर जाणाऱ्या तपासाची सुरुवात असल्याचे संकेत देत आहे.









