अलिबाग (प्रतिनिधी): नागाव ग्रामपंचायत हद्दीतील डावाळे परिसरात प्रस्तावित Switching Station / MSEB Substation प्रकल्पासाठी आवश्यक जागेचे भाडेतत्त्वावर हस्तांतरण अधिकृतरित्या पूर्ण झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली ही प्रक्रिया अखेर पूर्णत्वास गेल्याने नागाव व परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेली प्रशासकीय पूर्तता आणि कागदपत्रांची प्रक्रिया आज यशस्वीरित्या पूर्ण झाली.
निसर्ग चक्रीवादळानंतर परिसरातील वीजयंत्रणेला मोठा फटका बसला होता. त्यानंतर भविष्यातील आपत्ती व वाढता विद्युत वापर लक्षात घेऊन स्वतंत्र Switching Station उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, जागेच्या हस्तांतरणासंदर्भातील प्रशासकीय बाबीमुळे प्रकल्प रखडला होता. सरपंच सौ. हर्षदा निखिल मयेकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत संबंधित विभागांशी समन्वय साधला आणि अखेर ही प्रक्रिया मार्गी लावली.
या कामासाठी तहसीलदार विक्रम पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, एमएसईबीचे मुख्याधिकारी शैलेश कुमार, नोंदणी अधिकारी सोपेकर, माजी सरपंच निखिल नंदकुमार मयेकर तसेच माजी बांधकाम सभापती राजेंद्र मयेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले आहेत.
सध्या थळ येथील सबस्टेशनवरून कोर्लईपर्यंतच्या लाईनद्वारे नागाव परिसराला वीजपुरवठा केला जातो. वाढत्या विद्युत लोडमुळे कमी व्होल्टेज, वारंवार लाईट फ्लक्चुएशन, लाईन ओव्हरलोड, अनियमित वीजपुरवठा व लोडशेडिंगच्या समस्या निर्माण होत आहेत. डावाळे येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन Switching Station मुळे वीजपुरवठ्याची गुणवत्ता सुधारेल, व्होल्टेज स्थिर राहील आणि वारंवार होणारे खंड कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरपंच सौ. हर्षदा मयेकर म्हणाल्या, “गावाच्या दीर्घकालीन विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे. हा प्रकल्प केवळ नागावपुरता मर्यादित नसून नागाव ते कोर्लईदरम्यानच्या गावांनाही त्याचा लाभ होईल.”
जागेचे हस्तांतरण पूर्ण झाल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुढील प्रशासकीय टप्पे वेगाने पूर्ण होण्याची शक्यता असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. नागाव व परिसराच्या दृष्टीने हा प्रकल्प दीर्घकालीन आणि परिणामकारक ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
Home ताज्या बातम्या अखेर सरपंच हर्षदा मयेकर यांच्या प्रयत्नांना यश; डावाळे येथे Switching Station प्रकल्पासाठी...









