अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या राजकारणात ‘दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक २१ जागा जिंकूनही शिवसेनाला सत्तेबाहेर राहावे लागले असून भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने सत्ता स्थापनेत आघाडी घेतली आहे.
निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आली. मात्र स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ मिळवण्यात अपयश आले. दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी स्वतंत्रपणे लढत देत समाधानकारक जागा मिळवल्या. निकालानंतर दोन्ही पक्षांमध्ये सत्तेसाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आणि अखेर दोघांनी एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा केला.
या घडामोडींमुळे सर्वाधिक जागा असूनही शिवसेनेला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. शिवसेना नेत्यांनी या घडामोडींवर नाराजी व्यक्त करत जनतेने दिलेला कौल डावलला गेल्याचा आरोप केला आहे. “जनाधार आमच्याकडे असूनही राजकीय गणितांमुळे आम्हाला सत्तेबाहेर ठेवले गेले,” अशी प्रतिक्रिया पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, भाजप–राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी स्थिर आणि विकासाभिमुख कारभारासाठी एकत्र आल्याचे सांगितले. जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण भागातील योजनांना गती देण्यासाठी ही आघाडी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्हा परिषदेत पुढील पाच वर्षे सत्तेचे समीकरण कसे राहते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आक्रमक विरोधी पक्षाची भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत असून, आगामी काळात राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.









