अलिबाग (प्रतिनिधी) : पुण्याकडे निघालेल्या मारुती सुझुकी कंपनीच्या ब्रीजा (क्र. MH-14 LU-5099) या चारचाकी वाहनाने भर रस्त्यात अचानक पेट घेतल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सलग चार दिवसांच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पुण्यातील पर्यटक रायगड जिल्ह्यात आले होते. सुट्टी संपल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघाले असताना सायंकाळी सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास अलिबाग बायपासवरील एचपी पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. अलिबागकडून वडखळच्या दिशेने जात असताना कार अचानक रस्त्यात थांबली आणि काही क्षणांतच तिने पेट घेतला.
गाडीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकासह प्रवाशांनी तात्काळ बाहेर पडत जीव वाचवला. त्या वेळी तेथे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित साळुंखे (HC/1242) व होमगार्ड दिपणकर राऊळ यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अलिबाग नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली.
दरम्यान, जळालेले वाहन रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वाहन चालक व त्याच्यासोबत असलेले प्रवासी घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.









