जिल्हा रुग्णालय अलिबाग ला राज्यस्तरीय सन्मान आयुष्मान भारत डिजिटल मिशनमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक


रायगड (प्रतिनिधी): आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हा रुग्णालय अलिबाग यांनी राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रुग्णालयात ई-सुश्रुत या डिजिटल कार्यप्रणालीची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे रुग्णसेवा अधिक वेगवान, पारदर्शक आणि कार्यक्षम झाली आहे.
जानेवारी २०२६ या महिन्यात रुग्णालयात ६ हजारांहून अधिक टोकन जनरेट करण्यात आले. त्यापैकी ३ हजारांहून अधिक हेल्थ रेकॉर्ड लिंकेज ऑनलाइन ओपीडीद्वारे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. रुग्णालयातील सर्व १६ विभागांचे कामकाज पूर्णपणे डिजिटल करण्यात आले असून रुग्ण नोंदणी, तपासणी, उपचार व संदर्भ प्रक्रिया सुलभ आणि गतिमान झाली आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मा. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर व सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार आणि महाआरोग्य पुरस्कार २०२६” या प्रतिष्ठित पुरस्काराने रुग्णालयाला सन्मानित करण्यात आले.
या वेळी ठाणे सर्कलचे उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शीतल जोशी, मेट्रोन गायत्री म्हात्रे, मालती मोकल, स्मिता जोशी, फॅसिलिटी मॅनेजर आयेशा नवसीन पटेल तसेच सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.