पारिजात मुंबई आयोजित “गोष्ट मराठीची” कथा अभिवाचन स्पर्धेत पीएनपीच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश


अलिबाग (प्रतिनिधी): पारिजात मुंबई या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारी “गोष्ट मराठीची” शालेय विद्यार्थ्यांसाठी सांघिक कथा अभिवाचन स्पर्धा नुकतीच सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कुरुळ, अलिबाग येथे पार पडली.

या स्पर्धेत एकूण १० शाळांमधील २० संघांमधून ८५ विद्यार्थी सहभागी झाले होते, स्पर्धेचे परीक्षण शिक्षिका श्रीमती प्रमिला वैभव शेळके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. अलिबागमध्ये प्रथमच “गोष्ट मराठीची” स्पर्धा आयोजित करूनही शाळांचा व विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. या करिता अलिबागमधील शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पुढील काही वर्षांत अलिबाग तालुक्यातील इतर विविध गावांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्याचा पारिजातचा मानस आहे. तसेच, भविष्यात या संबंधित नवनवे उपक्रम राबवताना अलिबागकरांकडून सहाय्य व उत्तम प्रतिसाद लाभेल तसेच या उपक्रमास याहून अधिक प्रतिसाद शाळेकडून, विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून मिळेल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.

 स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ०१ मार्च रोजी पार पडला. यावेळी परीक्षकांनी विद्यार्थ्यांना कथा अभिवाचनाविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी मराठी काव्य, पोवाडे व नाट्य सादरीकरण केले. पारिजात मुंबई आणि गंमत शाळा अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला, सदर कार्यक्रमास श्रद्धा पोखरणकर, हिमालय चोरघे, सुशांत म्हात्रे, अवंती वर्तक, अनिष पानसरे, सुनील यादव, गौरी पालवणकर हे उपस्थित होते तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक व पारिजातचे स्नेही असे एकूण १२० हून अधिक जण उपस्थित होते.

अलिबाग येथील स्पर्धेत पाचवी ते सातवी गटामधून पी.एन.पी. माध्यमिक शाळा, वेश्वी ( कथा नाद, लेखक द. मा. मिराजदार ) या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला, सं. मं. हायस्कूल, नागांव (कथा पिटक्या डुकराची गोष्ट) या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला तसेच रा. जि. प. शाळा, वायशेत ( कथा हत्तीला वाचविणे, लेखक आ. ना. पेडणेकर ) या शाळेला उत्तेजनार्थ प्रमाणपत्र प्राप्त झाले. तसेच उत्तम अभिवाचक म्हणून मनस्वी राकेश कोरगावकर हिस व ध्रुव किरण म्हात्रे पास प्रमाणपत्र प्राप्त झाले.

तसेच या स्पर्धेतील आठवी ते दहावी या गटामधून पी.एन. पी. माध्यमिक शाळा, वेश्वी ( कथा श्यामची आई, लेखक – साने गुरुजी ) या शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला, या मध्ये कस्तुरी लोलगे, उपासना पाटील, अनुष्का लोंढे, कल्याणी बाणे यांनी सहभाग घेतला होता. पी.एन.पी. होली चाईल्ड, वेश्वी ( कथा अंधारातून प्रकाशाकडे ) शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला, या मध्ये यश जानकर, श्रेया मालोदे, जानवी जाधव, स्वरा मोरे, समृद्धी जयस्वाल तसेच पी. एन. पी. सायरस पूनावाला इंग्लिश मिडीयम स्कूल, नागांव ( कथा चिमुकली दिवटी, लेखिका सुधा मूर्ती ) या शाळेला उत्तेजनार्थ प्रमाणपत्र प्राप्त झाले. यामध्ये अथर्व घरत, तीर्था कर्णेकर, आस्था बळी, संस्कृती मयेकर, काव्या प्रधान तसेच उत्कृष्ट अभिवाचक म्हणून पी.एन. पी. माध्यमिक शाळा वेश्वीची विद्यार्थिनी उपासना उत्तम पाटील हिस प्रमाणपत्र प्राप्त झाले.

या नेत्रदीपक यशा बद्दल पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, माध्यमिक विद्यालय कुरुळच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील, पीएनपी शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, होली चाईल्ड एस. एस. सी. बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, पीएनपी सायरस पूनावाला इंग्लिश मिडियम स्कूल नागावच्या मुख्याध्यापिका गीतिका भूचर व विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.