विद्यूत खांब अपघातला निमंत्रण बेलकडे – सहाण मार्गावरील विद्यूत खांब काढण्याची मागणी  


अलिबाग (प्रतिनिधी): रुंदीकरणाच्या नावाखाली अलिबाग बायपास ते सहाण बायपास पर्यंत ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. रस्त्याच्या बाजूला रुंदीकरण करून पर्यायी वाहतूकीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक होत आहे. या मार्गावर रुंदीकरण  केल्याने या मार्गावरील पूर्वी पासूनचे विद्यूत खांब रस्त्याच्या मध्यभागी आले आहेत यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे, पर्यटकांची संख्या वाढत आहे त्यामुळे दिवसेंदिबवस ट्राफिक समस्या गंभीर होत चालली आहे. बेलकडे, ढवर, सहाण मार्गावरील हे खांब अपघाताला निमंत्रित ठरण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे खांब काढण्यात यावे तसेच खोदकाम केलेल्या ठिकाणी काम सुरू असल्याचे दिशादर्शक बॅनर लावण्यात यावेत अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत रस्ते विकास महामंडळामार्फत अलिबाग बायपास पासून सहाण बायपास पर्यंत रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम सुरु केले आहे. ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. वर्दळीचा भाग असलेल्या अरुंद रस्त्यावरून दुहेरी वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अनेकवेळा एकाच वेळी दोन्ही बाजूकडील वाहने जाणे कठीण होऊन बसले आहे. सर्वत्र रस्ते खोदकाम केले आहे. त्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. धुळीचे कण, नाका, तोंडात व तसेच डोळ्यात जाऊन मानवी आरोग्यावर परिणाम होत आहेत.

पावसाळा सुरु होण्यासाठी अवघे अडीच महिने शिल्लक राहिले आहेत. खोदलेल्या रस्त्याचे पावसाळ्यापुर्वी काम होणे अपेक्षित आहे. अन्यथा मागील वर्षी साळाव ते तळेखार मार्गावरील प्रवाशांच्या झालेल्या दुरावस्थेचे संकट अलिबागकरांवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी संथ गतीने काम न करता नियोजबध्द लवकरात लवकर काम करावे अशी मागणी होत आहे. या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम होत असताना बेलकडे, ढवर, सहाण मार्गावरील विद्युत खांब पर्यायी मार्गाच्या मध्यभागी येत आहेत. रात्री-बेरात्री या विद्यूत खांबाला धडक लागून अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. मध्यभागी असणारे विद्यूत खांब अपघाताला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे खांब तातडीने बाजूला हालविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.