ज्या शस्त्रांनी स्वराज्य उभं राहिलं, त्यांची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचावी : आकाश राणे


अलिबाग (प्रतिनिधी): स्वराज्याच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पारंपरिक शस्त्रांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मावळा प्रतिष्ठानचे आकाश राणे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरली गेलेली तलवार, भाला, ढाल, कट्यार यांसारखी विविध शस्त्रे आणि त्यांचा इतिहास या प्रदर्शनातून नागरिकांना पाहायला मिळत आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्वराज्याच्या युद्धपरंपरेची ओळख नव्या पिढीला करून देणे हा आहे. आजच्या तरुणांना इतिहासाची जाणीव व्हावी आणि स्वराज्य निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांचे महत्त्व समजावे, यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, असे आकाश राणे यांनी सांगितले.
या प्रदर्शनाला इतिहासप्रेमी, विद्यार्थी तसेच नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून स्वराज्याचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी नमूद केले.