अलिबाग (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत तसेच भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा महामंत्री मा. सतीशजी धारप यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप अलिबाग शहरच्या वतीने अलिबाग नगर परिषदेतील महिला साफसफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला. समाजाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला अलिबाग नगर परिषदेचे नगरसेवक ॲड.अंकित बंगेरा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुनील दामले, ॲड. वैशाली बंगेरा, पल्लवी जोशी, तनुजा पेरेकर, विजेता सारंग, धीरज ओसवाल, अँड. मानस कुंटे, प्रसाद वैशंपायन, निखिल चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी महिलांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा पुष्पगुच्छ व सत्कारचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शहर स्वच्छ आणि सुबक ठेवण्यासाठी महिला सफाई कामगार दिवसरात्र मेहनत घेत असतात. त्यांच्या कष्टांमुळेच शहराचे आरोग्य आणि स्वच्छता टिकून राहते, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
महिलांचे समाजातील योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महिला दिनानिमित्त त्यांच्या कार्याला सलाम करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.









