अलिबाग (प्रतिनिधी): ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांच्या आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मंजिरी पाटील यांनी महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात स्वच्छता राखणे, संतुलित व पौष्टिक आहाराचे महत्त्व तसेच नियमित आरोग्य तपासणी का आवश्यक आहे याबाबत त्यांनी उपस्थित महिलांना मोलाची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली.
या आरोग्य शिबिरात अनेक महिलांची तपासणी करण्यात आली व त्यांना आवश्यक त्या आरोग्यविषयक सूचना देण्यात आल्या. तसेच उपस्थित महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये स्वच्छता व आरोग्याबाबत सकारात्मक संदेश पोहोचला.
हा उपक्रम उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीम. उज्ज्वला भालचंद्र चंदनशिव, संस्थेचे सचिव व माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, तसेच संस्थेचे खजिनदार डॉ. नितीन गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. त्यांच्या प्रेरणेमुळे जागतिक महिला दिन समाजोपयोगी व अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला.
या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.









