अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात एचपीव्ही लसीकरण सुरू १४ ते १५ वयोगटातील मुलींना लसीकरण करण्यासाठी आवाहन


अलिबाग(प्रतिनिधी): महिला आणि मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ राज्यस्तरावर रविवारी महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातही एचपीव्ही लसीकरण करण्यास सोमवारी (ता.९) सुरुवात करण्यात आली.
आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व पात्र मुलींना ही लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी किशन जावळे, राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी एचपीव्ही लसीकरण मोहिमेची तयारी, नियोजन, विविध विभागामधील समन्वय, लसीकरण सत्रांचे नियोजन, मानव संसाधन उपलब्धता, कोल्ड चेन व्यवस्था तसेच जनजागृती मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित सर्व विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये गर्भाशय मुख कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला अटकाव करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या पुढाकाराने १४ वर्ष पूर्ण झालेल्या पण १५ वर्षाखालील वयोगटातील मुलींना एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. एचपीव्ही संसर्ग हा गर्भमुख कर्करोगाचा प्रमुख कारणीभूत घटक आहे. वेळेत लसीकरण केल्यास या आजारापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळू शकते. त्यामुळे किशोरवयीन मुलींचे लसीकरण हा प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय मानला जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विशेषता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबाला मोठा दिलासा मिळणार आहे.
लसीकरणानंतर ३० मिनिटे आरोग्य केंद्रावर थांबणे आवश्यक आहे. काही वेळा हलका ताप किंवा इंजेक्शन दिलेल्या जागी थोडे दुखणे यासारखे किरकोळ लक्षणे दिसू शकतात. जी २-३ दिवसात बरी होतात.
रायगड जिल्ह्यातील सर्व पालक आणि नागरिकांनी आपल्या 14 ते 15 वयोगटातील सर्व मुलींना गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळवावे आणि या महत्त्वपूर्ण सार्वजनिक आरोग्य मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे, राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहूलकर यांनी केले आहे.

*************
पोर्टल वर व प्रत्यक्षात करता येईल नोंदणी :
ज्या मुलींनी वयाची 14 वर्षे पूर्ण केली आहेत (14 ते 15 वयोगटातील मुली) अशा सर्व मुलींना हे लसीकरण करण्यात येणार आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत ओपीडीच्या वेळेत हे लसीकरण सुरू आहे. या मोहिमे अंतर्गत क्वार्डीवॅलेट एचपीव्ही लस दिली जाणार असून, या वयोगटातील मुलींसाठी लसीचा फक्त एकच डोस संरक्षणासाठी पुरेसा आहे. पालकांना ‘U-Win’ पोर्टलवर स्वतःहून नोंदणी करता येईल किंवा लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन नोंदणीची सोय उपलब्ध आहे.