मुरुड (प्रतिनिधी): मुरुड-साळाव या ३२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे एका वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख ॲड. महेश मोहिते यांनी केली आहे.
मुरुड-साळाव रस्त्यावर ठिकठिकाणी मोऱ्या बांधण्यासाठी मोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. मात्र या खड्ड्यांभोवती कोणत्याही प्रकारची बॅरिकेडिंग किंवा इशारा फलक लावण्यात आलेला नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. याच खड्ड्यात पडून वनरक्षक सूरज सारंगे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेनंतर प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून ॲड. महेश मोहिते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “रस्त्याचे काम करताना नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. मात्र येथे ठेकेदाराने पूर्णपणे निष्क्रिय आणि संवेदनाहीन भूमिका घेतली आहे,” असे त्यांनी सांगितले.
या वेळी भाजपचे कार्यकर्ते महेश मानकर व इतर मान्यवर उपस्थित होते. मोहिते यांनी पुढे सांगितले की, मुरुड-साळाव रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने यापूर्वी साळाव ते तळेखार रस्त्याचे कामही केले होते. त्यामुळे या प्रकरणी ठेकेदारावर तातडीने कारवाई करून मुरुड पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
Home ताज्या बातम्या मुरूड-साळाव रस्त्याच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी – ॲड. महेश...









