रायगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीस अवघे तीन दिवस शिल्लक असताना जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकलेल्या शिवसेना (शिंदे गट) कडून महायुती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला बाजूला ठेवून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. दरम्यान, अलिबागमध्ये विजयी मेळाव्याची तयारी सुरू झाल्याने शिवसेना गोटात अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे.
रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक ७ फेब्रुवारी रोजी पार पडली होती. ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपला १५, राष्ट्रवादी काँग्रेसला १६, शिवसेना (शिंदे गट) ला २१, शिवसेना (ठाकरे गट) ला ५ तर काँग्रेसला २ जागा मिळाल्या. सर्वाधिक जागा मिळूनही शिवसेना (शिंदे गट) सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांचे सदस्य जवळपास पंधरा दिवस गोव्यात एकत्र मुक्कामाला असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) चांगलीच अडचणीत सापडल्याचे दिसून आले.
स्थानिक पातळीवरील चर्चेचे मार्ग बंद झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी संपर्क साधून महायुती टिकवण्याचे प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या विषयात पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक १२ मार्च रोजी होणार आहे. अध्यक्षपद आपल्याकडे येणार, या विश्वासाने भाजपकडून आनंदोत्सवाची तयारीही सुरू करण्यात आली आहे. निकालानंतर अलिबाग समुद्रकिनाऱ्यालगतच्या मैदानावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी मेळावा आयोजित करण्याची तयारी सुरू असून त्यासाठी भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
या मेळाव्यास भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचे समीकरण निश्चित होणार का, की शेवटच्या क्षणी राजकीय समीकरणात बदल होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Home ताज्या बातम्या रायगड जिल्हा परिषद सत्तासमीकरणांमध्ये वेग; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीपूर्वी राजकीय हालचाली तीव्र









