ज्येष्ठ चित्रकार किशोर ठाकूर यांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ महाराष्ट्राच्या समृद्ध कला परंपरेचा गौरव!


पेण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ (सन २०२३–२४) ज्येष्ठ चित्रकार किशोर ठाकूर यांना प्रदान करण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
मुंबईतील ऐतिहासिक जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाच्या (कलाकार विभाग) उद्घाटन समारंभात हा पुरस्कार देण्यात आला. शिल्पकला क्षेत्रातील दीर्घकालीन व उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने ठाकूर यांना हा मानाचा पुरस्कार बहाल केला.
याप्रसंगी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिम चॅटर्जी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, संबंधित अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
पेण तालुक्यातील उंबर्डे येथील रहिवासी असलेले किशोर ठाकूर (जन्म : १ जून १९५७) यांनी शिल्पकला क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. त्यांनी १९७७ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून ‘आर्ट टीचर’ डिप्लोमा प्राप्त केला. त्यानंतर १९८१ मध्ये मुंबई येथील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकला व मॉडेलिंग (G.D. Art – Sculpture & Modelling) आणि १९८७ मध्ये मेटल क्राफ्ट (G.D. Art) या विषयात शिक्षण पूर्ण केले.
त्यांच्या कलाकृतींना राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात त्यांनी विविध विभागांमध्ये अनेकदा पुरस्कार पटकावले आहेत. तसेच १९९१ मध्ये राजस्थान ललित कला अकादमी, जयपूर यांचा राष्ट्रीय पुरस्कार आणि २००४ मध्ये ललित कला अकादमी, नवी दिल्ली यांचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.
मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी आणि बजाज आर्ट गॅलरी येथे त्यांच्या अनेक एकल कला प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच देश-विदेशातील विविध कला प्रदर्शनांमध्ये आणि शिल्पकला शिबिरांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
त्यांच्या शिल्पकृतींचा संग्रह ललित कला अकादमी, नवी दिल्ली, मॉडर्न आर्ट गॅलरी, नवी दिल्ली तसेच गोवा कला अकादमी येथे जतन करण्यात आला आहे. शिल्पकला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे.