प्रसूतीनंतर काही तासांतच मातृवियोग; अलिबाग जिल्हा रुग्णालयातील घटनेने हळहळ


अलिबाग (प्रतिनिधी): बाळाच्या जन्माचा आनंद साजरा होत असतानाच एका दुर्दैवी घटनेने अलिबाग जिल्हा रुग्णालय परिसरात शोककळा पसरली आहे. प्रसूतीनंतर अवघ्या काही तासांतच ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून आईविना पोरके झालेल्या नवजात बाळामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे श्रीवर्धन येथील व सध्या अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथे वास्तव्यास असलेले विशाल विश्वनाथ दुर्गावले यांच्या पत्नी विवा विशाल दुर्गावले (वय ३२) यांना प्रसूतीसाठी ९ मार्च रोजी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ११ मार्च रोजी पहाटे सुमारे दोनच्या सुमारास विवा यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. सुरुवातीला प्रसूती सुखरूप पार पडल्याचे सांगण्यात आले आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
मात्र काही वेळातच विवा दुर्गावले यांना अचानक श्वसनाचा त्रास सुरू झाला. प्रकृती झपाट्याने खालावत असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात हलवले, तर नवजात बाळाला ‘स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट’मध्ये ठेवण्यात आले. उपचार सुरू असतानाही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.
अखेर १२ मार्च रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास विवा दुर्गावले यांची प्राणज्योत मालवली. अवघ्या दोन वर्षांपूर्वी विवाह झालेल्या या दाम्पत्याच्या आयुष्यात आलेल्या पहिल्या अपत्याचा आनंद मातेच्या अकाली निधनाने हिरावून घेतला. या घटनेमुळे दुर्गावले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. उपचारांबाबत शंका उपस्थित करत त्यांनी जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा व व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.