अलिबाग (प्रतिनिधी): केंद्र आणि राज्यात महायुतीतील तिन्ही घटक पक्ष एकत्रितपणे काम करत असले तरी रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो. राजकारणात बदलत्या परिस्थितीनुसार अनेक घडामोडी घडत असतात. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची निवडणूकपूर्व युती होती आणि जनतेने आम्हाला निवडून दिल्यामुळे सत्ता स्थापनेचा अधिकार आमच्याकडे आला. मात्र महायुतीच्या निर्णयामुळे शिवसेनाही सत्तेत सहभागी झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा एक चांगला दिवस असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यातील वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली असून, जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या १२ जिल्ह्यांमध्ये समन्वयाने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांच्या निवडीनंतर विशेष समित्यांच्या वेळी सत्ता वाटपाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
लोकशाही व्यवस्थेत पदाधिकारी आणि प्रशासन हे दोन्ही घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. पदाधिकारी नसतील तर प्रशासन आपल्या मर्जीने काम करण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची ठरते, असे त्यांनी नमूद केले.
निवडणुकीनंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी संपर्क साधला होता. प्रत्येक पक्षाला आपले धोरण ठरवण्याचा अधिकार असतो. स्थानिक राजकारणात परिस्थितीनुसार अनेक बदल घडत असतात. माझ्या ४० वर्षांच्या राजकीय प्रवासात संघर्ष आणि संवाद या दोन्ही गोष्टी अनुभवायला मिळाल्या आहेत. राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर मतभेद असले तरी स्थानिक पातळीवर काही वेळा वेगळे निर्णय घ्यावे लागतात, असेही ते म्हणाले.
जोपर्यंत आम्ही प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत आहोत, तोपर्यंत आमचे राजकारण लोकांच्या पाठबळावरच सुरू राहील. आम्ही आणि आमची पुढील पिढीही सक्षम असून भविष्यातही लोकांसाठी काम करत राहू, असा विश्वासही खासदार तटकरे यांनी व्यक्त केला.






