अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा न्यायालय, अलिबाग येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन दृकश्राव्य प्रणालीद्वारे उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मा. राजेंद्र द. सावंत उपस्थित होते.
यावेळी बोलताना न्यायमूर्ती सावंत यांनी लोक अदालतीचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी जास्तीत जास्त लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. लोक अदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणे तडजोडीने व जलदगतीने निकाली निघतात, त्यामुळे संबंधित पक्षकारांचा वेळ व खर्च वाचतो, असे त्यांनी सांगितले. न्यायालयीन प्रक्रियेत निकाल एका बाजूने लागतो; मात्र लोक अदालतीत समेटातून तोडगा निघत असल्याने दोन्ही पक्षांना समाधान मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वकिलांनी पक्षकारांना प्रकरणातील जमेच्या व उणीवांच्या बाजू समजावून सांगून तडजोडीसाठी प्रवृत्त करावे, असेही त्यांनी नमूद केले. कौटुंबिक, मालमत्ता व अतिक्रमणासारखे वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी लोक अदालती उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तेजस्विनी निराळे यांनी केले. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विविध न्यायिक अधिकारी, वकील व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन जिल्हा वकील संघटनेचे सचिव अमित देशमुख यांनी केले.






