रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय लवकर व्हावा – सुनील तटकरे


अलिबाग(प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर घ्यावा, अशी अपेक्षा खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा निर्णय तातडीने होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत यापूर्वी निर्णय जाहीर झाला होता. मात्र त्या निर्णयावर काही स्तरावर भावना व्यक्त झाल्याने तो निर्णय सध्या स्थगित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध विकासकामांवर परिणाम होऊ नये, यासाठी या प्रश्नावर त्वरित तोडगा काढणे गरजेचे असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असल्याचेही त्यांनी नमूद केले. कोणता निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार असला, तरी जिल्ह्याच्या हितासाठी हा विषय अधिक काळ प्रलंबित राहू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
रायगड जिल्ह्यात विविध विकासकामे, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि प्रशासनाशी संबंधित निर्णयांसाठी पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळण्यासाठी पालकमंत्री पदाचा निर्णय लवकर व्हावा, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडूनही होत आहे.