अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग शहरात पंचवीसहून अधिक हॉटेल व खानावळ व्यावसायिक कार्यरत आहेत. पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या अलिबागमध्ये पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची हॉटेलांमध्ये नाश्ता आणि जेवणासाठी नेहमीच मोठी गर्दी असते. मात्र, अलीकडे घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध न झाल्याने हॉटेल व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सिलिंडर मिळण्यात येणाऱ्या अडचणींमुळे अनेक हॉटेल चालकांनी पर्यायी व्यवस्था शोधण्यास सुरुवात केली आहे. काही हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत चुली पेटवून त्यावर स्वयंपाक करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. लाकूड किंवा इतर इंधनाचा वापर करून स्वयंपाक तयार केला जात असून त्यामुळे ग्राहकांची सेवा खंडित होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, ज्या हॉटेलांच्या मागे मोकळी जागा उपलब्ध नाही अशा ठिकाणी इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. काही व्यावसायिकांनी इलेक्ट्रिक शेगड्यांच्या सहाय्याने नाश्ता व जेवण तयार करण्यास सुरुवात केली आहे.

गॅस सिलिंडर पुरवठ्यातील अडचणींमुळे हॉटेल व्यवसायावर परिणाम होऊ नये यासाठी व्यावसायिक विविध पर्यायांचा अवलंब करत असल्याचे चित्र सध्या अलिबाग शहरात पाहायला मिळत आहे.






