अलिबाग एस.टी. स्टँड परिसरात सीएनजी टेम्पोमुळे धोकादायक परिस्थिती; नागरिकांची तक्रार


अलिबाग (प्रतिनिधी) : शहरातील एस.टी. स्टँड परिसरात सीएनजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. एस.टी. स्टँडजवळील मुख्य वीज वाहक लाईनला एका सीएनजी टेम्पोने धडक दिल्याची घटना नुकतीच घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला ‘पे अँड पार्क’मध्ये अनेक दुचाकी वाहने उभी असतात. त्याच ठिकाणी सीएनजी वाहतूक करणारी टेम्पो आणि इतर मालवाहू वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडीही वारंवार होत आहे. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या भागात सीएनजी वाहने उभी राहण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
जर या घटनेत मोठा अपघात घडला असता आणि जीवितहानी झाली असती, तर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.