रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सुनील तटकरे यांनी कर्जतचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात तब्बल ६५ कोटी ३ हजार रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. थोरवे यांनी केलेल्या गंभीर आणि निराधार आरोपांमुळे आपली सामाजिक व राजकीय प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करत तटकरे यांनी माणगाव येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रक्रियेसाठी त्यांनी सुमारे ३ लाख रुपयांचे न्यायालयीन शुल्कही भरल्याची माहिती समोर आली आहे.
खोपोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या मंगेश काळोखे प्रकरणानंतर आमदार थोरवे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार तटकरे यांच्यावर थेट आरोप केल्याचा उल्लेख या दाव्यात करण्यात आला आहे. तटकरे हे जिल्ह्याचे ‘आका’ असल्यासारखे वागत असल्याचा आरोप करत, ‘मंगेश काळोखे’ प्रकरणात त्यांचा हात असल्याचा तसेच हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा दावा थोरवे यांनी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या विधानांमुळे आपली प्रतिमा मोठ्या प्रमाणात डागाळल्याचा दावा करत तटकरे यांनी न्यायालयाची मदत घेतली आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, आपल्या तीन दशकांच्या सार्वजनिक जीवनात विविध महत्त्वाची पदे सांभाळल्याचे नमूद केले आहे.
तसेच थोरवे यांच्या विधानांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे सांगत संबंधित व्हिडिओ व सामग्री सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे आदेश द्यावेत, तसेच भविष्यात अशा प्रकारची विधाने करण्यास मनाई करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून न्यायालय पुढे काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Home ताज्या बातम्या रायगडमध्ये राजकीय खळबळ; सुनील तटकरे यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर ६५ कोटींचा मानहानी...






