रायगड पोलीस भरती परीक्षा सुरळीत; पुरुष ८५८ तर महिला २२० उमेदवार उपस्थित


रायगड (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेंतर्गत पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेली लेखी परीक्षा रविवारी (१५ मार्च) अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालयात सुरळीत पार पडली. सकाळी ११ ते १२.३० या वेळेत परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी उमेदवारांना सकाळी ८ वाजेपर्यंत केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सकाळपासूनच परीक्षा केंद्र परिसरात उमेदवारांची गर्दी पाहायला मिळाली.
या परीक्षेसाठी एकूण ११२५ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी १०७८ उमेदवारांनी परीक्षा दिली, तर ४७ उमेदवार अनुपस्थित राहिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पुरुष उमेदवारांमध्ये ९०२ पैकी ८५८ उमेदवार उपस्थित होते, तर ४४ उमेदवार गैरहजर राहिले. महिला उमेदवारांमध्ये २२३ पैकी २२० उपस्थित राहिल्या, तर ३ महिला उमेदवार अनुपस्थित राहिल्या.
परीक्षा पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने कडक नियम लागू केले होते. परीक्षा केंद्रात मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, तसेच इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. उमेदवारांची तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला.
संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पोलीस प्रशासनाच्या कडक देखरेखीखाली शांततेत व सुरळीत पार पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.