रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायतींच्या विविध अडचणी मांडल्या


अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत माजी आमदार पंडित पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी विविध गावांतील प्रतिनिधी आणि सर्वपक्षीय सदस्यांची समिती पंडित पाटील यांना भेटण्यासाठी आली होती.
बैठकीदरम्यान जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी करत पंडित पाटील यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेतली. अवैध उत्खननामुळे पर्यावरणाला तसेच स्थानिक प्रशासनाला अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय काही गावांमध्ये विकास आराखडा नसल्याने वाढत्या लोकसंख्येमुळे नियोजनाचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. गावांमध्ये मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहत असताना त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन आणि नागरिकांना पाणीपुरवठा कसा करायचा, याबाबत ग्रामपंचायतींसमोर मोठे आव्हान उभे राहत असल्याचे पंडित पाटील यांनी स्पष्ट केले.
या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. जिल्हा प्रशासनाने यावर सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.