मिनी सरस व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री महोत्सव रापिजचा पुढाकार; खाद्यपदार्थांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी


अलिबाग (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत महिला स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून करण्यात आले आहे. या प्रदर्शनात रायगड जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी बनवलेली दर्जेदार नाविन्यपूर्ण उत्पादने एका छताखाली मिळणार आहेत. यासोबतच विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून विविध खाद्यपदार्थ व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना मिळणार आहे. प्रदर्शनाचे आयोजन 20 ते 24 मार्चदरम्यान करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात खरेदीसोबतच पारंपरिक खाद्यपदार्थ व सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी नागरिकांसह पर्यटकांनाही मिळणार आहे. यामध्ये गवळण, आडवाटेची आध्यात्मिक यात्रा हा लोकनृत्यावर आधारित कार्यक्रम, मराठी-हिंदी सदाबहार गाण्यांच्या ऑर्केस्ट्रा, ⁠महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम, ⁠शेतकरी मेळावा, नाशिकचे सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक हभप रंगनाथ महाराज नाईकडे यांचे ग्रामविकास प्रबोधनपर मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहे. यासोबतच कार्यक्रमासाठी सिने अभिनेते भाऊ कदम व मराठी अभिनेत्री संजना काळे यांची उपस्थिती लाभणार आहे.
हा प्रदर्शन व विक्री महोत्सव 20 ते 24 मार्चदरम्यान अलिबाग समुद्रकिना-याजवळील मैदानात स. 10 ते रात्री 10 वा. पर्यंत भरणार आहे. या महोत्सवासाठी नागरिकांसह पर्यटकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यक्रारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी केले आहे.

**********

एकूण 102 स्टाॅल:
या प्रदर्शन व विक्री महोत्सवात एकूण 102 स्टाॅल असणार आहेत. तसेच सुमारे 86 बचतगटांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये 69 स्टाॅल हे विविध प्रकारच्या वस्तू, 13 स्टाॅल खाद्यपदार्थ, शासकीय विभागांत कृषी विभागाचे स्टाॅल, जिल्हा उद्योग केंद्राचे 2 स्टाॅल, महिला आर्थिक विकास महामंडळाचे 4 स्टाॅल, महिला बालकल्याण बालकल्याण विभागाचा 1 तर शिक्षण विभागाचा 1 असे स्टाॅल उभारण्यात आले आहेत. यासोबतच जिल्हा परिषद व जिल्हा रूग्णालयाचे 2 आरोग्य पथक कार्यक्रमस्थळी तैनात असणार आहेत.

***********
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणा-या महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी तयार केलेल्या विविध कलाकृती आपणा सर्वांना महोत्सवात उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याची खाद्यसंस्कृती व सांस्कृतिक संस्कृतीचा आस्वादही घेता येणार आहे. त्यामुळे या महोत्सवाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्या.
मंगेश वाकडीकर, अध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद

*********
मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवात आपल्याला महिला बचतगटांनी तयार केलेल्या कलाकुसर, खाद्यपदार्थ याचा आस्वाद घेता येणार आहे. त्याचप्रमाणे लोकनृत्यावर आधारित कार्यक्रम, मराठी-हिंदी सदाबहार गाण्यांच्या ऑर्केस्ट्रा, ⁠महिलांसाठी खेळ पैठणीचा, ⁠शेतकरी मेळावा, ग्रामविकास प्रबोधनपर मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहे. यासोबतच कार्यक्रमासाठी सिने अभिनेते भाऊ कदम व मराठी अभिनेत्री संजना काळे यांची उपस्थिती लाभणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महोत्सवाला भेट द्यावी.
– नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद