गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेत सहयोग पतसंस्थेची सेवा भावना उजळली


अलिबाग (प्रतिनिधी) : गुढीपाडव्याच्या निमित्ताने अलिबाग शहरात आयोजित करण्यात आलेल्या स्वागत यात्रेत अलिबाग सहयोग पतसंस्थेने सेवा भावनेचा आदर्श घालून दिला. यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांसाठी पतसंस्थेकडून थंडगार पाणी व सरबताचे मोफत वाटप करण्यात आले. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमात पतसंस्थेचे कर्मचारी, संचालक मंडळ तसेच पदाधिकारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यात्रेतील सहभागी नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवेमुळे वातावरणात आनंद व समाधानाचे चित्र पाहायला मिळाले. पतसंस्थेच्या या सामाजिक बांधिलकीमुळे तिची ओळख केवळ आर्थिक संस्थेपुरती मर्यादित न राहता समाजाभिमुख संस्था म्हणून अधिक दृढ होत असल्याचे दिसून आले.
पतसंस्थेचे चेअरमन योगेश मगर यांच्या मार्गदर्शनाखाली असे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. समाजातील प्रत्येक घटकासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे समाजसेवेची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.