कुंडलिका खाडीत शिडवाल्या होड्यांची रंगतदार शर्यत; हिरावती होडी प्रथम


अलिबाग (प्रतिनिधी): गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे एकविरा मातेचा नारळाची ओटी भरण्याच्या निमित्ताने कुंडलिका समुद्र खाडीत पारंपरिक शिडवाल्या होड्यांच्या शर्यतीचा थरार अनुभवायला मिळाला. आग्राव दर्यातंरग मित्रमंडळ, पूर्वापाडा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतीला स्थानिक कोळी बांधव, महिला तसेच पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. दुपारी बारा वाजता आग्राव जेटी येथून शर्यतीला सुरुवात झाली.
यंदा एकूण आठ शिडवाल्या होड्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये हिरावती, हिरकणी, वसुंधरा, कमलावती, पद्मावती, लक्ष्मी, जयवंती आणि महालक्ष्मी या होड्यांचा समावेश होता. शर्यतीदरम्यान कुंडलिका खाडी परिसरात असंख्य इंजिन होड्यांची वर्दळ पाहायला मिळाली. त्यामुळे संपूर्ण खाडी परिसरात जत्रेचे वातावरण निर्माण झाले होते.
स्पर्धेत आग्राव येथील गुरूदास कामत यांच्या ‘हिरावती’ शिडवाल्या होडीने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तर आग्रावमधील हरिश्चंद्र शेट्टी यांच्या ‘हिरकणी’ होडीने द्वितीय स्थान मिळवले. कोर्लई येथील ‘कमलावती’ होडीने तृतीय तर ‘पद्मावती’ होडीने चतुर्थ क्रमांक मिळवून मानकरी ठरल्या.
विजेत्या स्पर्धकांना सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकासाठी १ लाख रुपये व भव्य चषक, द्वितीय क्रमांकासाठी ५५ हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकासाठी ३५ हजार रुपये व चषक, तर चतुर्थ क्रमांकासाठी उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
या पारंपरिक शर्यतीमुळे कोळी संस्कृतीचा वारसा जपला जात असून स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.