मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली निलेश चाकणकर यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करताना वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला आहे. दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांची महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती.
राजीनामा पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, कार्यकाळात त्यांना दिलेल्या विश्वासाबद्दल त्या शासनाच्या तसेच सहकाऱ्यांच्या शतशः ऋणी आहेत. आयोगाच्या कामकाजात मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले असून भविष्यातही असेच सहकार्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून त्यांनी हे पद स्वेच्छेने सोडण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, आपला राजीनामा मान्य करून पुढील कार्यवाही करावी, अशी नम्र विनंती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.
रुपाली चाकणकर यांच्या या निर्णयामुळे राज्य महिला आयोगाच्या पुढील नेतृत्वाबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.





